कळी उमलताना

07 Jul 2018 #Puberty

Blog Image

'ससा तो ससा दिसतो कसा?कापूस पिंजून ठेवलाय जसा’ अशी गाणी शिकवता शिकवता आणि ऐकता ऐकता आपली मुले कधी मोठो होतात हे लक्षातच येत नाही आणि जशी मुले १२-१३ वर्षाची होतात तेव्हा बहुतेक प्रत्येक घरात संवाद ऐकू येतो, “कारटयाला शिंगे फुटायला लागलीयत!” आणि इथूनच मुले आणि पालक यांच्यातील सुसंवादाला विसंवादाचे वळण लागायला लागते आणि पालक सोईस्कररित्या विसरायला लागतात की,आपणही कधी या वयाचे होतो. आपल्यालाही तेंव्हा बंधमुक्त आयुष्य हवेसे वाटत होते.
पौगंडावस्था म्हणजे वेगवान शारीरिक वाढीचा व भावनिक संघर्षाचा कालखंड. एकीकडून शरीर व मन फुलवणाऱ्या वसंताचे आगमन तर दुसरीकडून परीक्षा,अभ्यास,आई –वडिलांच्या अवास्तव अपेक्षांचे ओझे . ‘ शारीरिक व लैंगिक पूर्णत्व; मानसिकतेचे बाल्यावस्थेतून प्रौढावस्थेत स्थित्यंतर ; आर्थिक व सामाजिक परावलंबनापासून स्वावलंबनापर्यंतची वाटचाल अशी पौगंडावस्थेची व्याख्या केली आहे.
या वयात प्रत्येक मुलाला मग तो मुलगा असो वा मुलगी, आपले आई – वडील हे सर्वात जवळचे मित्र किंवा मैत्रीण वाटायला हवेत .हे सोपे नक्कीच नाही पण खरंच जर एका कळीचे सुंदर फुलात किंवा एखाद्या सुरवंटाचे सुंदर फुलपाखरात रुपांतर व्हावे असे वाटत असेल तर मुलांपुढे मैत्रीचा हात पालकांनीच आधी पुढे करायला हवा. काहीवेळा पालकांनी ‘बाबा वाक्यम प्रमाणम’ म्हणून काही जुने विचार उराशी कवटाळलेले असतात.अशावेळी विरोधाला विरोध अशी टोकाची भूमिका न घेता मुलांसोबत एकत्र बसून चर्चा करावी. योग्य-अयोग्य, खरं-खोटं, बरोबर-चूक याविषयी एकत्र बसून निष्कर्ष काढावेत.सुरवातीला हे अवघड वाटेल परंतु परस्परांमधील सुसंवाद कायम राखण्यासाठी हे खूप आवश्यक आहे.
कुणी म्हणेल, ‘आम्ही काय तरुण नव्हतो? तेव्हा कुणी आमच्या मनाचा विचार केला होता?’ पण पालकांनी स्वतःची किंवा त्या आधीची एक पिढी डोळ्यासमोर आणा. ‘शिस्त’ या नावाखाली मुलांना धाकात ठेवणे,लहान सहान कारणासाठी मार देणे, प्रेमाचा अभाव, भरपूर बंधने घालणे यामुळे किती कोवळी मने कुस्करली गेली याचा विचार करा.फक्त अभ्यास करून, नोकरी मिळवून भरपूर पैसा मिळवणे ही यशाची व्याख्या आहे का? याचा विचार करा.तसे असेल तर प्रकाश आमटे किंवा सिंधुताई सपकाळ यांच्यासारख्या व्यक्ती अयशस्वी म्हटल्या पाहिजेत.एखाद्या कलेत किंवा खेळात प्राविण्य मिळवून देखील आशा भोसले किंवा सचिन तेंडूलकर होता येते. मुलाला प्रेम देऊन जे जमते, ते टीका करून किंवा धाक दाखवून जमत नाही.घरात त्याला प्रेम,आपुलकी किंवा स्थैर्य नसेल तर तो घरापासून जास्तीत जास्त लांब राहण्याचा प्रयत्न करतो म्हणून आपण त्यांना वेळ दिला, त्यांना समजून घेतले तर नक्कीच त्यांचा विकास निकोप व मुक्तपणे होईल.
या वयातील अजून एक महत्वाची बाब म्हणजे ‘कामजीवन’. या वयात कामजीवनाविषयी जाणून घेण्यास प्रत्येक मुलगा/ मुलगी उत्सुक असतो. याविषयी गोपनीयता बाळगली तर त्यातून अज्ञान व अज्ञानातून गैरसमज निर्माण होतात. आपण गोपनीयता बाळगली तरी शाळा,कॉलेज, मित्र, चित्रपट, इन्टरनेट या माध्यमातून त्यांना या गोष्टी कळणारच आहेत.म्हणून लहानपणापासून कामाविज्ञानाची माहिती पायरीपायरीने मिळत गेली तर या विषयाचे अवास्तव आकर्षण राहणार नाही. शास्त्रीय ज्ञानापासून मुलांना वंचित केले तर, मग ते पोर्नोग्राफीद्वारे ‘ज्ञान’ संपादन करण्याच्या उद्योगाला लागतात म्हणून कामजीवन हे आवश्यक आहे, सुंदर आहे, नैसर्गिक आहे पण तितकेच जबाबदारीचे आहे. हे विचार मुलामुलीपर्यंत पोहचविले पाहिजेत.
कामजीवन आणि मन यांचा अगदी जवळचा संबंध असतो. प्रत्येक मुलाला कामवीचारासंबंधी शास्त्रीय माहिती द्यायला हवी तसेच त्याला उद्याचा नवरा, बाप, नागरिक या भूमिका योग्य रीतीने पार पाडायच्या आहेत याचीही जाणीव करून दिली पाहिजे. स्त्री – पुरुष म्हणजे नाण्याच्या दोन बाजू हे समजून सांगायला हवे. आपल्या आनंदासाठी एखाद्या मुलीला तिच्या मूल्यांचा बळी द्यायला लावणे हे योग्य नव्हे हे प्रत्येक मुलाच्या मनावर बिंबवले पाहिजे.मुलगी वेळेवर घरी आली नाही की आई अस्वस्थ होते पण मुलगा कुणा मुलीच्या नादी लागला तर तिला फरक पडत नाही. परंतु, त्यानेही कुणा मुलीला फसवू नये यासाठी मुलाच्या आईने जागरूक असावे.
कथा – कादंबऱ्या किंवा सिनेमातील प्रणय पाहून मुली हुरळून जातात. हे सिनेमातील प्रेम खरे नसून खरे जग किती वेगळे आहे व जागरूकतेने पावले टाकली नाहीत तर जीवन कसे उध्वस्त होऊ शकते हे समजावून सांगण्याचे काम आईचे.
जबाबदार पालकत्व म्हणजे मुलामुलींना सर्व ऐहिक सुख देणे असे नव्हे तर तितकीच जबाबदारीची जाणीव करून देणेही महत्वाचे आहे.

मुग्धा अभ्यंकर

-By मुग्धा अभ्यंकर