Let's Talk Sexuality

06 Mar 2018 #Sex Education

निवडीचा अधिकार, प्रतिष्ठा, वैविध्य, समानता आणि आदर हे पाच मानवी अधिकार आहेत. आणि हेच अधिकार लैंगिकतेची मूलभूत तत्वंदेखील आहेत. निवडीचा अधिकार स्वतःच्या लैंगिकतेबद्दळ निवड करण्याचा अधिकार प्रत्येकाला असायला हवा. ही निवड मुक्तपणे, कोणत्याही बंधनाशिवाय करता आली पाहिजे. अशी निवड करण्यासाठी पुरेशी माहिती हवी तसंच आवश्यक सेवा सुविधाही उपलब्ध असायला हव्यात. आपल्या निवडीमुळे इतरांच्या अधिकारांचं उल्लंघन होणार नाही आची आपण दक्षता घेतली पाहिजे. उदा. एखाद्या व्यक्तीला लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा असेल तर ते ठेवण्याचा, त्यासाठी आवश्यक ती साधने, गर्भानिरोधके मिळण्याचा तिला अधिकार आहे. मग ती विवाहित असो किंवा अविवाहित. प्रतिष्ठा प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठा आहे. वय, लिंग, जात, धर्म, लैंगिक कल, राहण्याचं ठिकाण काहीही असो, प्रत्येक जण मानस पत्र आहे. म्हणजेच प्रत्येकाला माहिती मिळण्याचा, लैंगिक आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळण्याचा अधिकार आहे. मग कुणी विवाहित असेल, एकटं राहत असेल, समलिंगी असेल किंवा भिन्नलिंगी. प्रत्येकाला सारखाच मान मिळणं अपेक्षित आहे. वैविध्य माणसं आपल्या लैंगिक इच्छा आवडी वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करतात. लैंगिक वर्तनही विविध पद्धतीचं असतं तसंच लैंगिक कलही वेगवेगळे असतात. हे वैविध्य जपण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. समानता लैंगिक स्वास्थ्यासाठी समानता गरजेची आहे. स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान आदर, प्रतिष्ठा असायला हवी. तसंच आरोग्याच्या सुविधा आणि माहितीही उपलब्ध असायला हवी. लहान असोत वा मोठे, अपंग असोत वा धडधाकट, मानसिक रुग्ण असोत किंवा एचआयव्हीसारखी इतर कोणतीही लागण झालेली असो, प्रत्येकाला माहिती मिळण्याचा, आवश्यक सेवा सुविधा मिळण्याचा अधिकार आहे. त्यांच्याबाबत कोणताही भेदभाव होता कामा नये. आदर प्रत्येक जण आदराला पात्र आहे. त्यांचं वय, त्यांच्या लैगिक निवडी किंवा त्यांचे लैंगिक कल – काहीही असेल तरी प्रत्येकालाच आदराने वागवलं गेलं पाहिजे. एखादी वेश्या व्यवसाय करणारी स्त्री किंवा पुरुष दवाखान्यात गेले असता त्यांना इतरांप्रमाणेच आदराने वागवलं गेलं पाहिजे आणि आवश्यक औषधोपचार मिळाले पाहिजेत.

-By ThatMate